शाळा

मी रोहित मांडगे. धर्मप्रकाश श्रीनिवासैय्या हाय स्कूल चा विद्यार्थी. आज मला शाळा सोडून साधारण १० वर्षे झाली. २००६ मध्ये मी दहावी पास झालो या शाळेतून. या शाळेचं आणि माझं नातं खूपच अतूट आहे. कुर्ल्यातील एका छोट्या चाळीतला मुलगा आज अमेरिकेला येऊन Master of Computer Science झाला, Amazon सारख्या मोठ्या कंपनी मध्ये जॉबला लागला, त्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मित्रांना आणि या माझ्या शाळेला जातं. खरंच या शाळेनेच मला घडवला असा म्हणेन मी. त्यासाठी मी माझ्या शाळेचा आजन्म ऋणी राहेन.

लहानपणापासूनच मी खूपच खट्याळ मुलगा होतो. इतका मस्तीखोर असून सुद्धा बालवाडी मधल्या शुभांगी ताई, छोटया शिशुच्या शारदा ताई आणि मोठ्या शिशुच्या स्वाती ताई या सर्वांनी खूप प्रेम दिलं. पहिली ते चौथी मध्ये असा एकही दिवस नसेल जेव्हा मी शिक्षकांचा ओरडा किंवा मार खाल्ला नसेल. ते सगळं माझ्या चांगल्यासाठीच होतं म्हणा. स्वप्नीला पवार बाई, परब बाई, भोसेकर बाई, कुलकर्णी बाई, जाधव बाई यांनी मला खरंच खूप सांभाळून घेतलं. गणित हा माझा खूपच जिवलग असा विषय. माझा आजही तेवढाच प्रेम आहे या विषयावर. त्यातच पाचवीला आले आमचे सर्वांचे लाडके नलावडे सर. शाळेच्या इतिहासात असा एकही विद्यार्थी नसेल ज्याचं सरांवर प्रेम नाहीये. भिवंडकर बाई, पाटील बाई, मोहिते सर, नागपूरकर सर, जामनेकर बाई, जाधव सर, सुतार सर, पवार सर, धुपकर सर, आसावरी गोखले बाई, खंदारे सर, गायकवाड बाई, म्हात्रे बाई, कुंभार सर या सर्वांनी आम्हा सर्वांनाच समान प्रेम दिलं आणि मनापासून विद्यादान केलं.

आमची बॅच हि सेमी इंग्लिश ची पहिली बॅच. प्रथमतः कोणीतरी विज्ञान आणि गणित आम्हाला इंग्लिश मध्ये शिकवणार होतं. सुरुवातीला खुपचं त्रास झाला परंतु नंतर त्याचं महत्व कळलं. त्यासाठी मी शाळेतील सर्व शिक्षकांना, आम्हा पालक वर्गातील भूषणचे बाबा आणि प्रचितीच्या आईचे आभार मानतो आणि इतर सर्व मित्रांच्या पालकांचे सुद्धा ज्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला.

सातवी हे माझ्या आयुष्यातील खूपच महत्वाचं वर्ष आहे असा म्हणेन मी. घरी परिस्थिती ठीक नसताना सुद्धा सर्व शिक्षक, मित्र आणि पालकांनी जी काही मला मदत केली आहे त्यासाठी मी त्यांचा आयुष्यभर ऋणी आहे, विशेषतः नलावडे सर आणि पाटील बाई. आम्ही सातवी स्कॉलरशिप मध्ये जे काही यश मिळवलं त्याचे श्रेय माझ्या शाळेलाच जातं.

तसं बघावं तर मी आयुष्यात अजून काही मोठी गोष्ट केलेली नाहीये, खूप लहान आहोत आम्ही अजून. मलाही भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे. मायदेशी परत येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे. आमच्यामध्ये या देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जी जिद्द आहे ती फक्त आणि फक्त या शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आहे. "शील घडविते तेच खरे शिक्षण" हा बाणा या शाळेने अगदी मनापासून जपला आहे. खूप आनंद होतो जेव्हा शाळेची बातमी मी टीव्ही आणि इंटरनेट वर बघतो. खूप सारे चांगले प्रकल्प येत आहेत शाळेमध्ये. इंग्लिश माध्यमचं फॅड असलेल्या समाजामध्ये या शाळेने आजही तिचा अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. आणि पुढे पण टिकवून ठेवेल याची मला खात्री आहे. 

Comments

Popular posts from this blog

Red-headed Nomad